एसटी बसमध्ये चढणाऱ्या महिलेची १ लाख रुपये किमतीची सोन्याची माळ लांबवली

लांजा एसटी स्टँड मधील घटना, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

लांजा (प्रतिनिधी) घरी जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची माळ लंपास केल्याची घटना लांजा एसटी बस स्टॅन्ड येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील रिंगणे हांदेवाडी येथील रहिवासी असलेल्या श्रीमती जयश्री एकनाथ बने (वय ७५) या दिनांक १९ मे रोजी काही कामानिमित्ताने लांजा येथे आल्या होत्या. दुपारी ३.१५ वाजता सुटणाऱ्या लांजा झऱ्यें या एसटी बस मधून त्या गावी रिंगणे येथे चालल्या होत्या. एसटी बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यात असलेली २६ ग्रॅम वजनाची आणि एक लाख रुपये किमतीची बारीक मण्याची एक पदरी सोन्याची माळ लंपास केली.
याप्रकरणी त्यांनी गुरुवारी ४ जून रोजी लांजा पोलीस ठाण्यात माळ चोरीला गेल्याची तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे तसेच भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. एस. रेवणे हे करत आहेत.