रत्नागिरीतील कापड व्यापारी बेपत्ता प्रकरणास मोठे वळण; कोलकाता येथे सापडले सुखरूप!

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी

रत्नागिरीतील प्रसिद्ध कापड व्यापारी सज्जन उर्फ पापा ओसवाल हे ८ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यांच्या मुलाने ९ ऑक्टोबर रोजी अपहरण झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. मात्र, आता पापा ओसवाल हे कोलकाता येथे सापडल्याचे वृत्त समोर आले असून, त्यांच्या शोधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि व्यापारी वर्गाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

रत्नागिरीतून निघाल्यानंतर सज्जन ओसवाल यांनी कोल्हापूर येथे नवीन मोबाईल आणि सिमकार्ड घेतले. त्यानंतर ते कोलकात्याला गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांनी काल एटीएममधून पैसे काढल्यानंतर त्यांच्या लोकेशनचा माग काढण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. लोकेशनच्या आधारे कोलकात्यातील व्यापारी मंडळींनी संबंधित परिसरात त्यांचा शोध घेतला. या शोधमोहीमेत सज्जन ओसवाल सापडल्याचे वृत्त आहे. त्यांना विमानाने मुंबईत आणण्याची तयारी सुरू असून, रात्रीपर्यंत ते मुंबईत पोहोचतील, अशी माहिती मिळत आहे. त्यांना आणण्यासाठी रत्नागिरीतील काही मंडळी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. ओसवाल बेपत्ता झाल्यापासून त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि व्यापारी वर्ग चिंतेत होता. त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणाही कार्यरत होती. अखेर कोलकात्यात त्यांचा शोध लागल्याचे वृत्त समोर आल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे.