पोस्ट विभागाने काढले पहिले गोलाकार पोस्टकार्ड
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानाच्या गौरवशाली कला-परंपरेचा आज देशभरात पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. संस्थानकालीन अद्वितीय ‘गंजिफा’ कला आणि कोकणातील पारंपरिक ‘दशावतार’ कलेला भारतीय टपाल विभागाने विशेष पोस्ट तिकिटावर आणि गोलाकार पोस्टकार्डवर स्थान देऊन नवा उंची गाठली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच चौकोनी नसून गोलाकार स्वरूपातील पोस्टकार्ड या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे सावंतवाडीची कला-संस्कृती आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे.
कला-परंपरेचा राष्ट्रीय गौरव
भारतीय टपाल विभागाने सावंतवाडीच्या दोन महत्त्वपूर्ण लोककलांना हा सन्मान बहाल केला आहे. या विशेष पोस्टकार्डवर दशावतार गंजिफा कलेचे सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. दशावतार ही कोकणातील जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेली आणि येथील लोकांच्या जीवनात खोलवर रुजलेली पारंपरिक लोककला आहे. एकेकाळी केवळ राजघराण्यांच्या दरबारात खेळली जाणारी ‘गंजिफा’ कला आता देशाच्या पोस्ट तिकिटावर झळकत आहे, ही सावंतवाडीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
ऐतिहासिक सोहळ्याला राजघराण्याची उपस्थिती
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबई येथे आयोजित सोहळ्याला सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले उपस्थित होते. राजघराण्याच्या उपस्थितीमुळे या सन्मानाचे महत्व अधिक वाढले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या समृद्ध लोककलांना एक मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. या गंजिफा पोस्ट कार्डच्या माध्यमातून सावंतवाडीची कला देशोदेशी पोहोचेल. सावंतवाडीच्या कला-संस्कृतीचा, परंपरेचा आणि स्थानिक कलाकारांच्या मेहनतीचा हा गौरव आहे. सावंतवाडी संस्थानाच्या परंपरेला आणि कला-वारसाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा मोठा सन्मान केवळ सिंधुदुर्ग आणि कोकणासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या कला-इतिहासासाठी एक सुवर्णाक्षरी क्षण ठरला आहे.














