वेर्ले येथे गोवा बनावटीची दारू जप्त

एकूण २२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

​सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करून गोवा बनावटी अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. वेर्ले येथील गावठण वाडी आणि झेंगाट वाडी या दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
​या कारवाईत शिवराम कृष्णा राऊळ आणि राजेंद्र तुकाराम राऊळ या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
​गावठण वाडी येथे शिवराम कृष्णा राऊळ यांच्या घरावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी १५ बल्क लीटर (ब.ली.) गोवा बनावटी दारू आणि ४ ब.ली. किन्वित बिअर असा एकूण ₹२२,२५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा र.नं. २०९/२०२५ नोंद करण्यात आला आहे.

​दुसरी कारवाई झेंगाट वाडी येथे राजेंद्र तुकाराम राऊळ यांच्या घरावर करण्यात आली. या ठिकाणाहून १०.८० ब.ली. गोवा बनावटी दारू आणि ४.५ ब.ली. किन्वित बिअर असा एकूण ₹१०,८६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा र.नं. २१०/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
​राज्य उत्पादन शुल्क कुडाळ विभागाचे निरीक्षक मिलिंद शिवाजीराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे सीमावर्ती भागातील अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.