लांजा नगरपंचायतीची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर

नगराध्यक्ष तसेच १७ पैकी ९ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने न.पं.वर येणार महिलाराज

लांजा (प्रतिनिधी) लांजा-कुवे नगर पंचायतीच्या १७ प्रभागासाठी आरक्षण सोडत आज बुधवारी सकाळी काढण्यात आली. न.पं.च्या एकुण १७ प्रभागांपैकी ९ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने आणि नगराध्यक्ष पदही महिलेसाठी आरक्षित झाल्याने नगर पंचायतीवर महिलाराज येणार आहे.

लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणाची ही सोडत बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लांजा शहरातील पोलिस वसाहत येथील संकल्प सिद्धी बहुउद्देशीय सभागृह येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मारुती बोरकर, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार, तहसीलदार प्रियांका ढोले, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, नगरपंचायत कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, अनघा भाटकर आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा लांजा नं. ५ या शाळेतील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या रिषभ वैभव पवार, मयंक मंगेश मोहिते, सुभद्रा श्रीकांत दास, ज्ञानेश्वरी प्रसन्न शिंदे व शुभ्रा मंगेश पाटोळे या विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.

लांजा नगरपंचायत हद्दीतील प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :

प्रभाग क्र.१ सर्वसाधारण (महिला),

प्रभाग क्र.२ सर्वसाधारण,

प्रभाग क्र.३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),

प्रभाग क्र.४ अनुसूचित जाती (महिला),

प्रभाग क्र.५ सर्वसाधारण,

प्रभाग क्र.६ सर्वसाधारण,

प्रभाग क्र.७ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),

प्रभाग क्र.८ सर्वसाधारण,

प्रभाग क्र.९ सर्वसाधारण,

प्रभाग क्र.१० सर्वसाधारण (महिला),

प्रभाग क्र.११ सर्वसाधारण (महिला),

प्रभाग क्र.१२ सर्वसाधारण (महिला),

प्रभाग क्र.१३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),

प्रभाग क्र.१४ सर्वसाधारण,

प्रभाग क्र.१५ नागरिकांचा मागास प्रवर्ग,

प्रभाग क्र.१६ नागरिकांचा मागास प्रवर्ग,

प्रभाग क्र.१७ सर्वसाधारण महिला

अशी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.

या आरक्षण सोडतीनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या पुरूष उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. आधीच नगराध्यक्ष पद हे महिलेसाठी आरक्षित झाल्याने या पदावर डोळा ठेवून असलेल्या उमेदवारांची पुरती निराशा झाली होती. त्या पाठोपाठ आता १७ पैकी ९ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणी नगरसेवक पदाचे डोहाळे लागलेल्या इच्छुक उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे. दुधाची तहान ताकावर या प्रमाणे आता इच्छुक उमेदवारांनी आपल्या पत्नीला कशी संधी मिळेल यासाठी यासाठी धडपड सुरू केली आहे.
सध्या सर्वत्र ऑक्टोबर हिटमुळे वातावरण तापले असताना आरक्षण सोडतीननतर राजकीय वातावरण देखील तापण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्यामुळे अनेक इच्छुकांचा चांगलाच हिरमोडही झाला आहे. तर विविध प्रभागांमध्ये नवीन उमेदवार कोण असतील याचे देखील औत्सुक्य सर्वसामान्य नागरिकांना लागून राहिले आहे.