नवरात्री स्पर्धेत ६ ठिकाणी प्रथम क्रमांक; उद्योजक सचिन पिलणकर यांच्याकडून ५१ हजार रुपयांचे बक्षीस
रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंदाच्या नवरात्री उत्सवात झालेल्या जिल्हास्तरीय ढोल वादन स्पर्धांमध्ये श्री महालक्ष्मी काजरघाटी ढोल वादन संघाने अभूतपूर्व यश संपादन करत नवा इतिहास रचला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ९ ठिकाणी स्पर्धा पार पडल्या, त्यापैकी या संघाने तब्बल सहा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
संघाच्या या न भूतो न भविष्यति कामगिरीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मुलांचा हा जोश व जल्लोष कायम राहावा, तसेच आगामी सर्व स्पर्धांमध्ये संघाला असेच यश मिळत राहावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावचे प्रतिष्ठित उद्योजक श्री. सचिन शेठ भगवान पिलणकर यांनी संघाचे विशेष कौतुक केले आहे.
गावाच्या प्रत्येक कार्याला आणि चांगल्या उपक्रमांना कायम आर्थिक व मानसिक पाठबळ पुरवणारे म्हणून श्री. पिलणकर यांची ओळख आहे. त्यांनी संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल शाबासकी म्हणून रोख रक्कम ५१,०००/- (एकावन्न हजार रुपये) देऊन त्यांचा गौरव केला.
श्री महालक्ष्मी काजरघाटी ढोल वादन संघाने श्री. पिलणकर यांच्या या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, त्यांचा आशीर्वाद संघावर कायम राहावा यासाठी त्यांनी ग्रामदैवत आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना केली आहे. या यशाने संघाचा झेंडा आणि गावाचे नाव जिल्हास्तरावर अभिमानाने फडकले आहे.












