मुंढर ओळवणवाडी येथून मे महिन्यापासून होते बेपत्ता
गुहागर प्रतिनिधी :
गुहागर तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुहागर तालुक्यातील मुंढर ओळवण वाडी येथून मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा हाडांचा सांगाडा आज सकाळी माळरानावर आढळून आला आहे. प्रमोद धोंडू कांबळे असे या मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या अंगावरील कपड्यांवरून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आहे.
प्रमोद कांबळे हे गेल्या मे महिन्यापासून घरातून बेपत्ता होते.तशी बेपत्ता असण्याची नोंद गुहागर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात सुद्धा आली होती.आज सकाळी ओळवण वाडी येथील माळरानावर एक स्थानिक ग्रामस्थ अळंबी शोधण्यासाठी गेला असता, त्याला अचानक हाडांचा सांगाडा दिसून आला. मृत प्रमोद कांबळे यांना पहिल्यापासूनच फिट्स येण्याचा त्रास होता, अशी माहिती स्थानिक गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे माळरानावर गेले असताना अचानक फिट आल्याने, तिथेच पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज स्थानिकांकडून वर्तवला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून,तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नोंद करून गुहागर पोलीस आता पुढील तपास करत आहेत.













