खेड (प्रतिनिधी) –
खेड तालुक्यातील हेदली नं. १ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीची अवस्था गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जीर्ण झाली होती. शाळेने नुकतेच १२५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने शाळेच्या दुरुस्तीची गरज प्रकर्षाने जाणवत होती. याच काळात लोटे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीचे अधिकारी गावात आले असता गावकऱ्यांनी त्यांना शाळेला भेट देण्याची विनंती केली. शाळेची दुर्दशा पाहून त्यांनी तात्काळ मदतीचे आश्वासन दिले आणि कंपनीने शाळेची नवी इमारत उभारून दिली.
मात्र, कोकणातील मुसळधार पावसामुळे नव्या इमारतींनाही नुकसान होण्याची शक्यता कायम असल्याने गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. याबाबत गावकऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा केली आणि गावातील काही नागरिकांनी पुढाकार घेऊन अॅड. वैभव खेडेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संपूर्ण परिस्थिती ऐकून घेतली आणि शाळेसाठी टिकाऊ पत्रा शेड उभारण्यासाठी आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यानुसार अॅड. खेडेकर यांनी तत्काळ लोटे एमआयडीसीमधील दीपक नोव्होकेम टेक्नॉलॉजीज लि. कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व उपक्रम (CSR) २०२४-२५ अंतर्गत शाळेसाठी पत्रा शेड उभारण्याचा निर्णय घेतला. या पत्रा शेड चे शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. वैभव खेडेकर (माजी नगराध्यक्ष, खेड), मा. श्री. श्रीकृष्ण सावंत (मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, दीपक नोव्होकेम टेक्नॉलॉजीज लि.), मा. सौ. बर्नाली सेनगुप्ता (एच.आर. हेड) आणि मा. श्री. अमोल अकुलकर (एच.आर. मॅनेजर) उपस्थित होते. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता सुरक्षित आणि सोयीस्कर शिक्षणाचे वातावरण उपलब्ध झाले आहे. गावकऱ्यांनी तसेच शिक्षकवर्गाने दीपक नोव्होकेम टेक्नॉलॉजीज लि. आणि अॅड. वैभव खेडेकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.











