नगरसेवक पदासाठी ४६ तर नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार रिंगणात; १३,९९५ मतदार ठरवणार खेडचे भविष्य
खेड : — खेड नगरपरिषदेत होणाऱ्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीला रंग चढू लागला असून यंदा नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार आणि सदस्य पदासाठी तब्बल ४६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सर्व उमेदवारांचे राजकीय भविष्य शहरातील १३,९९५ मतदारांच्या हाती असून खेडचा नगराध्यक्ष कोण होणार आणि नगरपरिषदेत कोणते चेहरे निवडून येणार, याचा अंतिम निर्णय हे मतदारच घेणार आहेत.
दरम्यान, नगरपरिषदेने निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. यावर्षी शहरातील १० प्रभागांमध्ये एकूण २० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. गतवेळच्या तुलनेत नगरपरिषद सदस्यसंख्या वाढवण्यात आली असून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक १,९४६ मतदार तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वात कमी १,०५७ मतदार आहेत.
मतदान केंद्रांसाठी जिल्हा परिषद शाळा, अल मदिना वेलफेअर असोसिएशन शाळा, एल.पी. इंग्लिश स्कूल, एल.टी.टी. हायस्कूल, हाजी एस.एम. मुकादम हायस्कूल आणि अंजुमन तालीम उर्दू शाळा या शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. सर्व केंद्रांवर मूलभूत सुविधा, पिण्याचे पाणी, सावली, मार्गदर्शन फलक आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. एकूण १०० कर्मचारी—८० मतदान केंद्र कर्मचारी आणि २० पोलीस कर्मचारी—मतदान दिवशी तैनात असतील. तसेच २० मतदान केंद्रांना तीन झोनमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी नेमण्यात आले आहेत. निवडणुकीदरम्यान आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तीन विशेष पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.
सोमवार सकाळी ११ वाजल्यापासून मतदान यंत्रणा आणि कर्मचारी त्यांच्या-त्यांच्या केंद्रांसाठी रवाना झाले असून शहराचे राजकीय भविष्य ठरणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. १३,९९५ मतदारांच्या बोटांवर आता खेडचा पुढचा नगराध्यक्ष आणि नगरपरिषद सदस्य कोण ठरणार याचा उत्सुकता निर्माण करणारा निर्णय अवलंबून आहे.











