सावंतवाडीत रिक्षा व्यावसायिकाची मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या; १६ तासांनी मृतदेह गाळात सापडला

​सावंतवाडी: शहरातील मोती तलावात उडी घेऊन रमेश भगवान जाधव (वय ६१) या रिक्षा व्यावसायिकाने गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ते सालईवाडा येथील रहिवासी होते आणि गेली अनेक वर्षे शहरात रिक्षा चालवत होते.
​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा रमेश जाधव हे आपली रिक्षा घेऊन राजवाडा समोरील मोती तलावाच्या रस्त्यावर आले. त्यांनी आपली चप्पल बाहेर काढून थेट तलावात उडी घेतली. काठावर असलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करत तात्काळ पोलिसांना कळवले. नागरिकांनी तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.

​यानंतर, शुक्रवारी सकाळी बाबल अल्मेडा रेस्क्यू टीमच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. तब्बल सोळा तासांच्या प्रयत्नानंतर रमेश जाधव यांचा मृतदेह तलावातील गाळात रुतलेल्या अवस्थेत सापडला. गुरुवार रात्रीपासून तलावाच्या काठावर उभी असलेली त्यांची रिक्षा पाहून ही आत्महत्या रमेश जाधव यांनीच केली असल्याची चर्चा होती, मृतदेह मिळाल्यावर ती बाब स्पष्ट झाली.

​मनमिळावू आणि हसऱ्या स्वभावाचे असलेले रमेश जाधव हे शहरातील अनेक लोकांसाठी परिचित होते. या घटनेची माहिती मिळताच मोती तलावाच्या काठावर नागरिकांनी व रिक्षा व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती.
​मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलगा कलश जाधव याने दिलेल्या खबरीनुसार, सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सावंतवाडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.