‘दशावतार’ भाषेची मर्यादा ओलांडून जागतिक स्तरावर पोहोचला

मालवणी भाषा येथील दशावताराची गोडी जगभरात पोहचली याचा अभिमान

शुटींग झालेल्या गावागावात भेट देत सुरु आहे आभार दौरा

अद्याप तरी सिक्वल बाबत विचार नाही…

कणकवली :प्रादेशिक भाषांतील सिनेमा तयार करताना भाषेची मर्यादा येऊ शकते. मात्र, ‘दशावतार’ चित्रपटाची कथा दमदार असल्याने तो भाषेची मर्यादा ओलांडून ग्लोबल झाला, असे मत चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचणारा कोकणच्या मातीतील ‘दशावतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटांच्या फार्सिकल वाटा वागळून वेगळ्या वाटेने गेलेला आणि कोकणच्या सांस्कृतिक आयामातील महत्त्वाची कला दशावतार कलेला मध्यवर्ती ठेवून बनवलेल्या दशावतार चित्रपटाला थिएटर्समध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. या यशानंतर चित्रपटाच्या टीमने प्रहारच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सुबोध खानोलकर यांच्यासह निर्माते ओंकार काटे, सुजय हांडे, कार्यकारी निर्माते चंद्रशेखर ननावरे उपस्थित होते. सर्वांचे प्रहारच्यावतीने स्वागत करण्यात आले.

‘दशावतार’ला मिळालेल्या यशाबद्द्ल सर्वांनी भरभरून संवाद साधला. यशानंतर जिथे जिथे शुटींग केले. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सध्या सिंधुदुर्ग दौरा करत आहोत. असे ते म्हणाले. चाकोरीच्या बाहेर जाऊन चित्रपट बनवायचा असल्याने तीन-चार वर्षे कथानकावर मेहनत घेऊन तो बनवण्यात आला. चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर यश मिळणे न मिळणे यावर आमचा फोकस नव्हता. चित्रपटाची कथा, येथील निसर्ग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, हेच आमच्या मनात होते. मालवणी भाषेतील, मातीतील कथानक म्हणून कोकणापुरते हे चित्रपट मर्यादित राहीला नाही तर परराज्यांसह परदेशातील चित्रपटाने प्रेक्षक खेचला. अगदी गुवाहाटीतील चित्रपटगृहातही चित्रपटाला प्रेक्षक मिळतो आहेच त्याशिवाय जर्मनी, जपान,कतार आदी देशातही चित्रपटाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे.

मोबाईलमध्ये चित्रपट पाहायची सोय झालेली असताना आणि कंटेंटचा चारही बाजूने भडीमार होत असताना प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहाकडे वळवणे हे आजच्या घडीला मोठे आव्हान आहे. मराठी चित्रपटांना थिएटर मिळणेही कठीण झाले आहे. अशा काळात चित्रपटाला मिळणारे यश समाधान मिळवून देणारे आहे, असे ‘दशावतार’च्या टीमने सांगितले. यावेळी चित्रपटासह मालवणी माणूस, दशावतार, चित्रपटा दरम्यान घडलेल्या विविध गंमती जमती याबद्दल त्यांनी मनमोकळा संवाद साधला .

यावेळी प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांच्यासह किशोर राणे, संतोष राऊळ, माणिक सावंत, मिलिंद पारकर, मारूती घाडी, मयूर ठाकूर उपस्थित होते.