महिलेच्या हृदय शास्त्रक्रियेसाठी ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचा मदतीचा हात

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : गोवा बांबोळी येथे अन्नपूर्णा गावकर या पेशंटच्या महत्त्वाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तब्बल आठ रक्तदात्यांची तातडीची गरज असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था’ मदतीला धावून आली. संस्थेच्या सात रक्तदात्यांनी त्वरीत जीएमसीच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले आणि यशस्वी शस्त्रक्रियेसाठी मोठे सहकार्य केले.

गेला महिनाभर रखडलेल्या या हृदय शस्त्रक्रियेची तारीख अचानक निश्चित झाली. त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांची धावपळ सुरू झाली. ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचे हितचिंतक तथा ओटवणे पोलिस पाटील लक्ष्मण गावकर यांनी संस्थेचे सचिव श्री. बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधून रक्ताच्या गरजेबद्दल माहिती दिली.

श्री. गवंडे यांनी तत्काळ ही माहिती संस्थेच्या सोशल मीडिया समूहांवर प्रसारित केली, तसेच व्यक्तीशः संपर्क साधून चार रक्तदात्यांना रक्तपेढीकडे पाठवले. त्याचप्रमाणे, लक्ष्मण गावकर आणि संस्थेचे नियमित रक्तदाते जयगणेश गावकर यांनीही चार रक्तदात्यांना त्वरित उपलब्ध करून दिले. संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांनीही या तातडीच्या मागणीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले.

*सात रक्तदात्यांचे तातडीचे रक्तदान*

यावेळी अभिजित गवस, अक्षय जाधव, देविदास पाटकर, जयगणेश गावकर, लिंगोजी सुतार, ओंकार गावकर आणि श्याम जाधव या सात रक्तदात्यांनी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. दिगंबर वीर हे देखील रक्तदान करण्यासाठी गेले होते, परंतु सात रक्तदात्यांमुळे रक्ताची गरज पूर्ण झाल्याने त्यांना राखीव ठेवण्यात आले. दरम्यान, आवश्यक रक्त मिळाल्यामुळे ही हृदय शस्त्रक्रिया (बायपास) व्यवस्थित आणि यशस्वीरित्या पार पडली.

या रक्तदात्यांमध्ये काही नियमित आणि अनुभवी रक्तदाते आहेत. जयगणेश गावकर यांचे हे आत्तापर्यंतचे तब्बल २५ वे रक्तदान होते, तर अभिजित गवस यांचे २३ वे, देविदास पाटकर यांचे १९ वे आणि अक्षय जाधव यांचे १३ वे रक्तदान होते. याशिवाय, श्याम जाधव, ओंकार गावकर आणि लिंगोजी राऊत यांनीही यापूर्वी अनेक वेळा तातडीच्या वेळी रक्तदान करून जीवनदान दिले आहे.

संस्थेसह नातेवाईकांकडून आभार

बायपास शस्त्रक्रिया अचानक ठरलेली असतानाही, संस्थेच्या तातडीच्या प्रतिसादामुळे आणि रक्तदात्यांच्या तत्परतेमुळे अन्नपूर्णा गावकर यांना वेळेवर रक्त उपलब्ध झाले. याबद्दल पेशंटच्या नातेवाईकांनी ‘ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे’ आणि रक्तदात्यांचे विशेष आभार मानले.

संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस आणि कार्यकारिणी सदस्यांनी रक्तदानासाठी गेलेल्या या सर्व रक्तदात्यांचे तसेच या मदतकार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ ही गरजू पेशंटसाठी तातडीने रक्त उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असून, त्यांचा हा उपक्रम अनेकांना जीवनदान देणारा ठरत आहे.