सावंतवाडी तालुक्यात ‘शाळा तेथे दाखले’ उपक्रमातून साडेदहा हजार दाखल्यांचे वाटप

आता ‘कॉलेज तेथे दाखला’ उपक्रम राबवणार : तहसिलदार श्रीधर पाटील

सावंतवाडी । प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्याने ‘शाळा तेथे दाखले’ या उपक्रमात आघाडी घेत जवळपास १०,१७० दाखल्यांचे वितरण केले आहे. आता यापुढे ‘कॉलेज तेथे दाखला’ हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने ‘सेवा पंधरावडा’ उपक्रमाद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महा-ई-सेवा केंद्राद्वारे तालुक्यात जवळपास साडेदहा हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. शनिवारी कलंबिस्त हायस्कूलमध्ये ५०० विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी तृप्ती घोडामिसे यांनी कार्यभार हाती घेताच विद्यार्थ्यांना थेट शाळेत दाखले देण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. महसूल विभागामार्फत वैद्यकीय दाखला अवघ्या एका तासात उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबर खो-खो, ॲथलेटिक्स यांसारख्या खेळांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “शाळेत जे शिकवले जाते, तेच योग्य पद्धतीने शिकले पाहिजे. ते तुमच्या जीवनाला कलाटणी देईल,” असे ते म्हणाले. तसेच, येत्या दिवाळी सुट्टीत ग्रंथालयातील एक तरी पुस्तक वाचावे आणि त्या आधारावर निबंध लेखन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड. संतोष सावंत यांनी, वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तरी पुस्तक वाचा हा उपक्रम आता शाळांमध्ये आयोजित केला जाईल आणि त्याची सुरुवात येथून होत आहे, असे सांगितले. महा ई सेवा केंद्राचे संचालक प्रमोद नाईक यांचे सुमारे २००० दाखले वेळेत तयार केल्याबद्दल कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला कलंबिस्त हायस्कूलचे संचालक सुनील राऊळ, ॲड. संतोष सावंत, मंडल अधिकारी सौ. भारती गोरे, प्रमोद नाईक, मुख्याध्यापक अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.