वाचनाने युवाई चे आयुष्य समृद्ध बनवणे, हीच आमच्या वाचनालयाची चळवळ आहे– ग्रंथपाल भारती नेरुरकर
फोंडाघाट:कुमार नाडकर्णी– कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच प्रा. मधु दंडवते ग्रंथालय व वाचनालय, फोंडाघाट येथे क्षेत्रीय भेट आयोजित केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासाचा एक भाग म्हणून आयोजित या भेटीत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदा हाताळण्याचा अनुभव घेतला आणि स्थानिक वाचकांशी संवाद साधला. फोंडाघाटमधील वाचनसंस्कृतीला चालना देणारी महत्त्वाची संस्था म्हणून प्रा. मधु दंडवते ग्रंथालय ओळखले जाते. वर्षभर येथे विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात, ज्यामुळे हे ग्रंथालय वाचनप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे.
या क्षेत्रीय भेटीवेळी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीमती भारती नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत आणि प्रा. जगदीश राणे यांना ग्रंथभेट देऊन त्यांचा सन्मान केला.
मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वाचनाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की,वाचनाने माणूस समृद्ध होतो आणि ही समृद्धी आयुष्यभर टिकते. पुस्तकांचा गुदमरलेला श्वास मोकळा करायचा असेल, तर त्यांना कपाटातून बाहेर काढून हळुवार हातांनी नजरेसमोर धरायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके हीच खरे मित्र असल्याचे सांगत, अशा मित्रांची मांदियाळी स्वतःभोवती गोळा करण्याचे भावनाप्रधान आवाहन केले.
प्रा. जगदीश राणे यांनीही विद्यार्थ्यांना ‘दिवसामाजी काहीतरी वाचतची जावे’ या उक्तीचा दाखला देत नियमित वाचनाचा सल्ला दिला. त्यांनी वाचनामुळे व्यक्तिमत्त्वात होणारा सकारात्मक बदल आणि ज्ञानार्जनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमात मराठी विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांनी ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके आणि संदर्भ साहित्याची पाहणी करून वाचनसंस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांना वाचनप्रेरणा मिळाली आणि हा उपक्रम अविस्मरणीय ठरला.
या क्षेत्रीय भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबद्दलची आवड निर्माण होण्यास मदत झाली असून, या भेटीने वाचनसंस्कृती रुजवण्याच्या कार्याला आणखी बळ मिळाले आहे.











