महायुतीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील : लखमराजे भोंसले
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यावेळी महिलांसाठी राखीव झाल्याने, येथील राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवण्याकरिता चर्चा सुरू असल्याची घोषणा संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी आज राजवाडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी राजे खेमसावंत भोंसले, राणी शुभदादेवी भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे
भोंसले आदी उपस्थित होते.
युवराज लखमराजे भोंसले यांनी सांगितले की, “जवळपास ३५ वर्षांपूर्वी शिवरामराजे भोसले आमदार होते. त्यानंतर आता नगरपरिषद निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचा विचार आम्ही करत आहोत. महिला आरक्षणामुळे आम्ही हा निर्णय घेतला असून, राजघराणे लोकांची सेवा करण्यास उत्सुक आहे. आम्ही शिक्षण, समाजसेवा, संस्कृती आणि कला क्षेत्रात कार्यरत आहोत. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या उमेदवारीसाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी आमचे बोलणे सुरू आहे. सावंतवाडीच्या जनतेने आजवर दिलेल्या प्रेमामुळेच पुन्हा या जनतेची सेवा करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही पक्षाकडे यासाठी अधिकृतपणे मागणी करणार आहोत आणि याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील.”
यावेळी त्यांनी महायुतीला सोबत घेऊन जाण्याचा आपला हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले, “आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. लोकांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्याशीही आमचे बोलणे झाले आहे. ते सावंतवाडी शहराचे अनेक वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत,” असे लखमराजे यांनी स्पष्ट केले.
’शहराचा विकास आणि परंपरा जपणे हाच उद्देश’ – युवराज्ञी श्रद्धाराजे
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, “राजकारण हे माझे क्षेत्र नसले तरी, यात काम करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. सावंतवाडीसाठी काम करण्याचा आणि शहराचा विकास साधण्याचा माझा मुख्य उद्देश असेल. तसेच, इथली ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठीही माझा प्रयत्न राहील. मी सावंतवाडीकर असल्याचा मला अभिमान आहे आणि सावंतवाडीला जागतिक स्तरावर (ग्लोबल स्तरावर) नेण्याचा माझा प्रयत्न राहील. पर्यटन वाढीसाठी विशेष लक्ष देणार असून, लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत.”
राजघराण्याची १९ वी पिढी राजकारणात सक्रिय
राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवत सांगितले की, “राजकारणात येऊन सामाजिक कार्य आणि विकासात्मक काम करण्याचा आमचा हेतू आहे. माझे वडील (स्वर्गीय) ५ वेळा आमदार राहिले आहेत. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज आणि राजेसाहेब शिवरामराजेंचा वारसा पुढे चालवण्यासाठी युवराज लखमराजे राजकारणात सक्रिय झाले आहेत आणि आता युवराज्ञी श्रद्धाराजे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. राजघराण्याची ही १९ वी पिढी राजकारणात सक्रिय होण्यास उत्सुक आहे. दोघेही राजघराण्याचा वारसा पुढे घेऊन जात आहेत आणि ते निश्चितच यशस्वी होतील,” असा विश्वास राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी यावेळी व्यक्त केला.












