वैद्यकीय क्षेत्रातील मसिहा हरपल्यास खंत
चिपळूण (प्रतिनिधी) : दळणवळणाची कोणतीच साधने नसताना त्यावेळच्या ग्रामीण चिपळुणात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. अरविंद गोखले यांचे पुणे येथे शनिवारी सकाळी ११ वाजता निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. चिपळूणच्या वैद्यकिय इतिहासात ते पहिले एमबीबीएस डॉक्टर होते. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रातील गरीबांचा मसिहा हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.
डॉ. गोखले हे मुळचे ओमळी या गावचे. त्यांचे वडील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे मुलानेही डॉक्टर व्हावे, असे त्यांना वाटले. त्याप्रमाणे डॉ. गोखले यांचा प्रवास सुरू झाला. चिपळुणातील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर ते पुणे येथे पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांनी मनिपाल मेडीकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण झाले, तेव्हा चिपळूण एक गाव होते. बाजारपेठ विकसित झाली नव्हती. दळणवळणाची साधनं नव्हती. अशावेळी डॉ. गोखले यांनी आपण ध्येयाने गावच्या लोकांची सेवा करण्याचा त्यांनी संकल्प केला. चिपळूण शहरातील वडनाका येथे १९६२-६३ च्या दशकात जनता हॉस्पिटलची त्यांनी निर्मिती केली. ते आणि त्यांची पत्नी डॉ. मीरा गोखले या दोघांनी अविरत सेवा दिली. चिपळूणमध्ये १९७५ पर्यंत ते प्रसुती, व अन्य शस्त्रक्रिया करत होते. त्यावेळी वाहने नसल्यामुळे गावागावांत जाऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत होते.
ग्रामीण भागात त्यांना गरीबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अविरत रुग्णांची सेवा केली. वैद्यकीय सेवा देत असताना संस्थापैकी एक होते. १९९० ते १९९३ या काळात ते या संस्थेचे अध्यक्ष होते. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. ते चिपळुणात रोटरीचे संस्थापक होते. डॉ गोखले यांच्या पश्चात पत्नी ज्या एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्याशिवाय मुलगा इंग्लंड येथे ऑर्थोपेडीक डॉक्टर आहे. मुलगी सिंगापूर येथे सीए आहे. उतारवयामुळे ते पुणे येथील त्यांच्या घरात वास्तव्य करत होते. त्यांची तब्बेत अचानक खालावली. त्यातच त्यांचे शनिवारी सकाळी ११ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच चिपळुणातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर पुणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंतिम विधीला डॉ. आशिर्वाद थत्ते सहकुटूंब जाणार असून वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजण सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.










