ले.कर्नल रत्नेश सिन्हा (निवृत्त) यांचे मोलाचे मार्गदर्शन
सावंतवाडी । प्रतिनिधी : आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना संरक्षण दलातील करिअरच्या संधी आणि सैनिक स्कूलमधील प्रवेश प्रक्रियेबद्दल सखोल माहिती मिळावी या हेतूने भोसले नॉलेज सिटीने शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी विशेष करिअर कौन्सिलिंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सकाळी ११ वाजता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशस्त सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (निवृत्त) हे उपस्थित राहणार असून, ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
ले.कर्नल सिन्हा सध्या सैनिक स्कूलचे कमांडंट तसेच भोसले नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संरक्षण दलातील त्यांचा व्यापक आणि बहुमूल्य अनुभव विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या मार्गदर्शन कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक स्कूलमध्ये प्रवेशाची प्रक्रिया, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, विविध अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये आणि संरक्षण दलातील तसेच इतर क्षेत्रांतील भविष्यातील करिअरच्या संधी याबद्दल तपशीलवार माहिती देणे आहे. सैनिक स्कूल हे शिस्त, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सैनिकी संस्कार यांचा उत्कृष्ट संगम असलेले शैक्षणिक केंद्र आहे, जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत प्रभावी ठरते.
या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचे करिअर घडविण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास भोसले नॉलेज सिटीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. इच्छूक विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ७८७५१४९७१७ किंवा ७४४८१८७१८९ या संपर्क क्रमांकांवर त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.











