८० हजारांची मदत जमा : १० ते १५ लाखांच्या मदतीची गरज
सावंतवाडी । प्रतिनिधी : निमोनिया या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील तीन वर्षीय बालिका कु. नृत्या महेश जांभोरे हिच्या उपचारासाठी सावंतवाडीतील दानशूर नागरिकांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे. समाजातील विविध घटकांकडून आतापर्यंत सुमारे ८१ हजार रुपयांची मदत जमा झाली असून, एकूण उपचारांचा खर्च १० ते १५ लाख रुपयांपर्यंत अपेक्षित असल्याने, तिच्या पुढील उपचारांसाठी समाजातील दात्यांनी अधिक सक्रियपणे सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील पंधरा-सोळा दिवसांपासून चिमुकली नृत्या निमोनियाशी संघर्ष करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिच्यावर प्राथमिक उपचार सुरू झाले, परंतु उपचारासाठी आवश्यक असलेली विशेष वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध नसल्यामुळे तिला अधिकच्या उपचारांसाठी कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत नृत्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केल्यानुसार तिच्या पूर्ण उपचारांसाठी सुमारे १० ते १५ लाख रुपयांचा मोठा खर्च अपेक्षित आहे.
या मानवतावादी उपक्रमासाठी सावंतवाडीतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
विशेषतः राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या २००८-०९ बॅचचे विद्यार्थी, तसेच नितीन राऊळ आणि अण्णा केळुसकर मित्र परिवार यांनी पुढाकार घेऊन निधी संकलनाचे कार्य हाती घेतले आहे. याचबरोबर विनोद राऊळ यांनी देखील एक मोठी मदत म्हणून २५ हजार रुपयांचे योगदान दिले आहे.
प्रारंभीच्या दिवसांत मदतीचा ओघ इतका वाढला की, गुगल पे आणि बँक अकाउंटवर पाठवण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी असलेल्या दिवसाकाठीच्या लिमिटमुळे अनेक दानशूरांना तात्काळ मदत पाठवता आली नाही, अशी अडचण निर्माण झाली होती. या समस्येमुळे अनेक इच्छुक दात्यांची मदत तात्पुरती थांबली होती. त्यामुळे आता ज्या दात्यांना मदत करायची आहे, त्यांनी कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय पुन्हा प्रयत्न करून सहकार्य करावे, असे नम्र आवाहन नितीन राऊळ आणि अण्णा केळुसकर यांनी केले आहे.
नृत्याच्या उपचारासाठी आतापर्यंत सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांची मदत विविध दात्यांकडून जमा झाली आहे. सावंतवाडीतील नागरिकांनी दाखवलेल्या या समाजबंधुत्व आणि मानवतेच्या उत्कृष्ट नमुन्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. चिमुकल्या नृत्याच्या या लढ्यात प्रत्येकाने आपली ‘खारीचा वाटा’ उचलावा आणि तिला लवकर बरे होण्यासाठी मदत करावी, असा संदेश या दानशूर नागरिकांकडून देण्यात आला आहे.











