देवगड l प्रतिनिधी :तळेबाजार चांदोशी येथील सौ. कांचन संजय म्हापसेकर (५८) यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या त्यांच्या मुलाला, सिद्धेश संजय म्हापसेकर (३०) याला सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने एडवोकेट आशिष लोके यांनी काम पाहिले.
या प्रकरणात सिद्धेश याच्याविरुद्ध देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५/२०२५ नोंदवला होता.
सिद्धेश याच्याविरुद्धचा गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) च्या कलम १०८ अंतर्गत दाखल करण्यात आला होता, जे पूर्वीच्या भारतीय दंड संहितेतील कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) प्रमाणे आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे करत होत्या.
घटनेप्रमाणे, ३० मे रोजी रात्री नऊच्या सुमारास सिद्धेश याच्या वारंवार होणाऱ्या वागणुकीला कंटाळून त्याचे वडील संजय म्हापसेकर आणि आई सौ. कांचन यांनी झोपेच्या गोळ्या आणि झुरळ मारण्याचे औषध सेवन केले. दुसऱ्या दिवशी, ३१ मे रोजी सकाळी नातेवाईकांनी दोघांनाही जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी सौ. कांचन यांचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर वडील संजय यांची प्रकृती स्थिर राहिली. संजय म्हापसेकर यांनी याबाबत देवगड पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी सिद्धेश याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. आशिष लोके यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या वैद्यकीय कागदपत्रांनुसार सिद्धेश याला मानसिक आजार असल्याचे दाखवले आणि त्याच्याकडून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा हेतू नव्हता, असा युक्तिवाद केला.
न्यायालयाने सिद्धेश म्हापसेकर यांना पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि त्याच रकमेच्या एका स्थानिक श्युअरिटीवर जामीन मंजूर केला आहे.











