परतीच्या पावसाने देवगडमध्ये दाणादाण, पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे तातडीचे नुकसानीच्या सर्वेचे निर्देश

शिरगावमध्ये चक्रीवादळ, राकसघाटी आणि निमतवाडीतील १२ घरांचे मोठे नुकसान

देवगड-नांदगाव मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प, ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांची शर्थ

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी महसूल विभागाला तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले

परतीच्या पावसाने देवगडमध्ये दाणादाण

देवगड : प्रतिनिधी

परतीच्या पावसाने देवगडमध्ये दाणादाण उडविली असून वीजांच्या कडकडाटासह बुधवारी सायंकाळी दोन तासात पावसाने देवगड तालुक्याला झोडपले. त्याचबरोबर शिरगाव परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून राकसघाटी आणि निमतवाडी परिसरातील १२ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी दिले आहेत. नुकसानग्रस्त भागाची वस्तुस्थिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दूरध्वनीद्वारे पालकमंत्री ना. नितेश राणे यांना कळवली, त्यानंतर त्यांनी महसूल विभागाला तातडीने पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या.

वीजांच्या कडकडाटासह बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर परतीच्या पावसाने देवगडमध्ये धुमाकूळ घातला. मान्सूनचा पाऊस गेल्यानंतर प्रखर उन्हामुळे तापलेले वातावरण अचानक गार झाले. मात्र सायंकाळी ४ नंतर अचानक वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा तडाखा शिरगाव भागाला बसला. देवगड–नांदगाव मार्गावर शिरगाव ग्रामपंचायतीजवळ मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. शिरगाव येथील ग्रामस्थ आणि वीज वितरण विभागाचे कर्मचारी यांनी झाड बाजूला करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. वीजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाल्याने काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता.