सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ओरोस (सिंधुदूर्ग) येथे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडास्पर्धेत आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा व पंचक्रोशीचा गौरव वाढवला आहे. या स्पर्धेत कु. अक्षता धोंडू झोरे हिने रौप्यपदक पटकावले असून, तिची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत कु. अक्षता धोंडू झोरे हिने ३ हजार मीटर धावणे या अत्यंत चुरशीच्या क्रीडाप्रकारात जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करत रौप्यपदकाची मानकरी ठरली. या यशाबद्दल तिची आता रत्नागिरी येथे होणाऱ्या प्रतिष्ठित विभागीय क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याचबरोबर, शाळेची दुसरी उदयोन्मुख खेळाडू कु. अश्मि संतोष पिंगुळकर हिनेही आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत तीन किलोमीटर चालणे या क्रीडाप्रकारात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक प्राप्त केले.
या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक श्री. निलेश देऊलकर यांचे मोलाचे व अथक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी कठोर सराव करून हे यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. निलेश परब, उपाध्यक्ष श्री. महादेव पांगम, सचिव श्री. शांताराम गावडे, शालेय समिती अध्यक्ष श्री. हेमंत कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिद्धेश नाईक, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव धुपकर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच, विभागीय स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अक्षता झोरे हिला शुभेच्छा दिल्या आहेत.










