९ मार्चला महिला दिनाचा भव्य कार्यक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीतील ‘घे भरारी फाउंडेशन’च्या वतीने महिला आणि युवतींच्या सुदृढ आरोग्यासाठी १ ते ३१ मार्च या कालावधीत महिनाभर मोफत झुंबा क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार, ९ मार्च रोजी शिव उद्यान येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला महिला दिन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
महिलांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी १ मार्चपासून काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे झुंबाचे वर्ग सुरू होत आहेत. दररोज संध्याकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत हे प्रशिक्षण दिले जाईल. विशेष म्हणजे मार्च महिनाभर यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवार ९ मार्च रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता सावंतवाडीतील शिव उद्यान येथे महिला दिनाचा मुख्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमात समाजात भरीव योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी आकर्षक ‘स्पॉट प्राईजेस’, ‘लकी ड्रॉ’ आणि गाणी-नृत्यांची मेजवानी असेल. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘घे भरारी’च्या महिला सदस्यांकडून सादर केला जाणारा दशावतारी नाट्यप्रयोग असणार आहे.
परिसरातील महिलांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर, कार्यकारी अध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी व खजिनदार स्वप्नाली कारेकर यांनी केले आहे.











