सावंतवाडी : शहरातील
येथील सालईवाडा भागात सकाळी फिरण्यास बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरीने खेचून पळून गेलेल्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने या आरोपींना आधी दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली होती. तेथील तपासादरम्यान त्यांनी सावंतवाडीतील गुन्ह्याचीही कबुली दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी आरोपींचा ताबा घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैभव नारायणराव अडोळे (वय २६, रा. एरला, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि करण गोरखनाथ जगधने (वय १९, रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. विधाते वस्ती, औंध गावठाण, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रीमती रंजना ठाकूर (रा. सालईवाडा सलाईकिलवाडा, सावंतवाडी) या बिल्डिंगखालील रस्त्यावरून चालत जात होत्या. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या या दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना मागून हिसकावून नेला आणि तेथून पोबारा केला होता. या घटनेनंतर सावंतवाडी शहरात खळबळ उडाली होती.
सावंतवाडीतील या घटनेनंतर काही दिवसांतच कोल्हापूर भागातही अशाच प्रकारची चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत वैभव अडोळे आणि करण जगधने यांना जेरबंद केले. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी सावंतवाडीतही रंजना ठाकूर यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरल्याची कबुली दिली.
*संशयितांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी; सोन्याचा दागिना हस्तगत*
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रमोद पाटील यांनी आपल्या पथकासह कोल्हापूर कारागृहात जाऊन दोन्ही संशयित आरोपींचा रीतसर ताबा घेतला. संशयित आरोपींची ओळख परेड (टी.आय. परेड) करायची असल्याने, त्यांची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांना चेहरा मास्कने झाकूनच वेळोवेळी न्यायालयात हजर करण्यात येत होते.
आज संशयित आरोपींना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० जुलै २०२६ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, सावंतवाडी पोलिसांनी आरोपींकडून संबंधित महिलेचा चोरीला गेलेला सोन्याचा दागिना हस्तगत केला असून, या टोळीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.













