दीड कि.मी. लांबीचा रस्ता ग्रामस्थांच्या एकजुटीचे प्रतीक
कुडाळ:– ग्रामपंचायत आंदुर्ले कार्यक्षेत्रातील फळयेफोंडा ते आवेरा हा सुमारे १.५ कि.मी. लांबीचा आणि ११ फूट रुंदीचा रस्ता ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकार झाला आहे. गेली २० वर्षे अपूर्ण असलेला हा रस्ता अखेर ग्रामस्थांच्या एकजुटीने पूर्ण झाला.
ग्रामस्थांनी स्वखर्चाने व अंगमेहनतीने रस्त्यातील झाडे, अडथळे दूर केले. अनेकांनी आपल्या मालकीतील आंबा, नारळ, सुरंग, साग इत्यादी उत्पन्न देणारी झाडे तसेच कंपाउंड तोडून रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. वाडीतील प्रत्येक घरातील पुरुष व महिलांनी चार ते पाच दिवस श्रमदान करून हा रस्ता पूर्णत्वास नेला. या कार्याबद्दल कुडाळ तालुका भाजप अध्यक्ष व माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सौ. आरती पाटील, सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच गोविंद मोर्ये, तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले व पुढील विकासकामांसाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
या रस्त्यामुळे वाडीतील नागरिकांना आता थेट वेंगुर्ला–म्हापण मुख्य रस्त्याशी जोडणी मिळाली असून, प्रवासाचा वेळ व अडचणी दोन्ही कमी झाल्या आहेत. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













