सरपंच अमित मडव यांच्या पाठपुराव्याला यश
कुडाळ :- कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावाने घरकुल योजनेत मोठी झेप घेतली असून, गावात तब्बल ११८ घरकुले मंजूर झाली आहेत. ही संख्या संपूर्ण कुडाळ तालुक्यातील सर्वाधिक असून, या योजनेतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनाही आता लाभ मिळणार आहे.
गावात जास्तीत जास्त नागरिकांना घरकुल योजनेचा फायदा मिळावा यासाठी सरपंच अमित भालचंद्र मडव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून आज जांभवडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत उपस्थितांना योजनेविषयी सविस्तर माहिती, आवश्यक मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या. सभेदरम्यान लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याबाबत चर्चा झाली. एका वर्षात एवढ्या मोठ्या संख्येने घरकुले मंजूर होण्याची ही जांभवडे गावातील पहिलीच वेळ आहे.
या प्रसंगी लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाला ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच अमित मडव, उपसरपंच श्री. पावसकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. बाबा परेरा, ग्रामपंचायत अधिकारी श्री. घोडके तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच अमित मडव यांनी या वेळी सांगितले की, “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध योजनांचा लाभ प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. तसेच गावातील उर्वरित विकासकामांसाठी मा. आमदार निलेशजी राणे साहेबांची भेट घेऊन ती कामे मार्गी लावू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












