घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्राची अंतिम परवानगी; आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्ग-कोल्हापूर जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’; अनेक वर्षांच्या स्थानिकांच्या मागणीला अखेर यश

कुडाळ :     सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला केंद्र सरकारकडून आवश्यक अंतिम परवानगी मिळाली आहे. यामुळे या महत्त्वपूर्ण घाटमार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून करण्यात येत असलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. या मंजुरीची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.

 

घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या प्रकल्पाला यापूर्वीच पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक असलेली अंतिम परवानगी मिळाल्याने प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

 

“आज अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देताना मनाला फार समाधान वाटत आहे. घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पर्यावरणीय मंजुरी अगोदरच मिळालेली होती. आता केंद्र सरकारकडून आवश्यक असलेली अंतिम परवानगीही मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे,” असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

 

या ऐतिहासिक प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी आभार मानले. तसेच प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि संबंधित सर्व घटकांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

 

घोडगे-सोनवडे घाटमार्गामुळे सिंधुदुर्गची कोल्हापूरशी असलेली वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होण्यास मदत होणार असून, सिंधुदुर्गच्या विकासाला तसेच परिसरातील पर्यटन, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

“हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता स्थानिक तसेच राज्य पातळीवर आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलली जातील. सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

 

केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीमुळे घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या निर्णयाचे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.