गुरुकुलातील मुलींवर अत्याचार प्रकरणात ग्रामस्थ व पीडित कुटुंबीयांचे तहसीलदारांना निवेदन

खेड(प्रतिनिधी): खेड तालुक्यातील लोटे परिसरातील अध्यात्मिक वारकरी गुरुकुल या संस्थेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी आज गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि पीडित मुलींचे कुटुंबीय यांनी तहसीलदार, खेड यांना लेखी निवेदन देऊन आरोपी भगवान कोकरे यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये पप्पू आंब्रे, अंकुश काते, अरुणाताई आंब्रे, राजेंद्र घाग, संदीप उर्फ बावा कदम, सुशांत कदम, योगेश घाग, शेखर मोरे, नामदेवराव घाग, अंकिता बेलोसे, संदीप गोवळकर, नंदू कांबळी, किरण घाग, सुरेश जाधव, नितीन खेराडे, सुरेश कारकर आदींसह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी निवेदनातून सांगितले की, “लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुलमध्ये कोकरे महाराज नावाच्या व्यक्तीने माझ्या मुलीसह इतर काही मुलींवरही लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार घडले आहेत. आम्ही गरीब आणि अशिक्षित कुटुंबातील आहोत. त्यामुळे आम्ही न्याय मिळवण्यासाठी शासनाकडेच आशा ठेवली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी आणि पीडित मुलींना न्याय मिळावा,” अशी मागणी देखील केली आहे. निवेदन स्वीकारताना तहसीलदारांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.