लोटे गुरुकुल प्रकरणात दुसऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार

कोकरे महाराजांवर गुन्हा दाखल

खेड | राकेश कोळी – 
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुल पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात आहे. दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली असताना, आता आणखी एका अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत नवीन तक्रार केली आहे.
या तक्रारीनंतर खेड पोलिसांनी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज, त्यांचे सहकारी शिक्षक प्रितेश कदम आणि पीडित मुलीची आत्या रोहिणी संतोष वामन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ ऑक्टोबर २०२४ ते १८ जून २०२५ या कालावधीत लोटे येथील गुरुकुलामध्ये घडली. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, धार्मिक शिक्षण आणि साधनेच्या नावाखाली कोकरे महाराजांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात प्रितेश कदम आणि रोहिणी वामन यांचा सहभाग असल्याचे तिने नमूद केले आहे. खेड पोलिसांनी या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम ६४(२)(१), ६५, ३५१(३), ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ चे कलम ४ व ८ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पहिल्या प्रकरणानंतर कोकरे महाराज आणि शिक्षक कदम यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता नव्या तक्रारीमुळे त्यांच्या विरोधात अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोटे गुरुकुलामध्ये अनाथ, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना मोफत शिक्षण व आध्यात्मिक संस्कार दिले जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, या आड लैंगिक शोषण आणि अमानुष वर्तनाचे प्रकार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. स्थानिक आणि सामाजिक संघटनांकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची तसेच गृहमंत्र्यांनी स्वतः दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणामुळे खेड तालुका आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस आणि प्रशासनाचे लक्ष या संवेदनशील प्रकरणाकडे केंद्रीत झाले आहे.