‘कोकण ट्रेल २०२५’ : निसर्गाच्या सान्निध्यात १०० किमीची आव्हानात्मक ‘वॉकाथॉन’

​ग्रीन ट्रेल फाऊंडेशनतर्फे सावंतवाडी येथे प्रथमच आयोजन : २८ नोव्हेंबरपासून प्रारंभ

​सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकणच्या नयनरम्य निसर्गातून, डोंगर-घाट आणि समुद्रकिनाऱ्यावरून चालण्याचा एक आगळावेगळा आणि आव्हानात्मक उपक्रम ‘कोकण ट्रेल २०२५’ ग्रीन ट्रेल फाऊंडेशनतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावरून या ‘वॉकाथॉन’ची सुरुवात आणि समारोप होणार असून, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा. याचा प्रारंभ होणार आहे. देश-विदेशातील सहभागींनी यात सामील व्हावे आणि जिल्ह्यातील लोकांनी देखील उत्साहाने भाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन बिर्जे यांनी केले आहे.
​आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री. बिर्जे म्हणाले की, ‘कोकण ट्रेल २०२५’ मध्ये दोन प्रमुख प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. मुख्य ट्रेल १०० किमी अंतराचा असून, ते सलग ५० तासांत पूर्ण करायचे आहे. तर लघु ट्रेल ५० किमी अंतराचा आहे, जो २५ तासांत पूर्ण करण्याचे आव्हान असेल.
​सहभाग टीम स्वरूपात अनिवार्य

​या ट्रेलमध्ये व्यक्तिगत सहभाग घेता येणार नाही. २, ३ अथवा ४ सदस्यांच्या टीम स्वरूपात सहभाग घेणे अनिवार्य आहे. सर्व इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. हा ट्रेल कोकणच्या हिरवाईतून, डोंगर-घाट, समुद्रकिनारा, गाववाडी, नदीकाठ व जंगलातून जाणार आहे. यामुळे सहभागी टीमला त्यांच्या मर्यादा ओलांडण्याची, कठीण ध्येय गाठण्याची आणि कोकणातील निसर्ग, संस्कृती व लोकजीवन अनुभवण्याची ही एक उत्तम संधी मिळणार आहे.
​सावंतवाडी-वेंगुर्ला तालुक्यातून मार्गक्रमण
​हा वॉकाथॉन सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातून गावागावातून मार्गक्रमण करून पुन्हा सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर ३० नोव्हेंबर रोजी समारोप होईल, अशी माहिती श्री. बिर्जे यांनी दिली. आयोजकांनी ट्रेल मार्गावर सहभागींच्या सोयीसाठी उत्तम व्यवस्था केली आहे. प्रत्येक १० किमीवर चेकपॉईंट ठेवलेले असून, तिथे वैद्यकीय मदत, पाणी, अन्न व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.

​ग्रीन ट्रेल फाऊंडेशनने हा उपक्रम स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व विविध संघटनांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. ज्यामुळे पर्यटनवृद्धी साधली जाईल. यामध्ये स्थानिक खेळाडू, माध्यम प्रतिनिधी, व्यावसायिक यांचाही सहभाग असेल.
​या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष सचिन बिर्जे यांच्यासह सदस्य केदार लेले आणि प्रशांत सावंत आदी उपस्थित होते.
​अधिक माहितीसाठी संपर्क :
९३२५५९६९८६ / ७७४५०४६२६५ / ९६६५१९६११५ / ९४२२१९४७८९