दापोली (विशेष प्रतिनिधी, राकेश कोळी) : दापोली तालुक्यातील जंगल परिसरात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या दुर्मिळ शेकरूचे दर्शन घडल्याने प्राणीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दापोलीतील विद्यापीठ परिसरात असलेल्या वनविभागाच्या कार्यालयाजवळील झाडांवर मुक्तपणे वावरत असलेल्या शेकरूचा व्हिडिओ सध्या समोर आला असून हा व्हिडिओ परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
समृद्ध आणि दाट जंगलांमध्ये आढळणारा शेकरू प्रामुख्याने महाबळेश्वर, कोयना आणि भीमाशंकर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. मात्र आता कोकणातील दापोली परिसरातही त्याचे दर्शन झाल्याने येथील जंगलांची समृद्धता आणि जैवविविधता अधोरेखित होत असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांचे मत आहे.
दापोलीतील विद्यापीठ परिसरात असलेल्या उंच झाडांवर मुक्तपणे फिरणारा शेकरू स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडला. त्यानंतर त्याचा व्हिडिओही काढण्यात आला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्राणीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून त्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत शेकरूला वाघाप्रमाणेच सर्वोच्च कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे दापोली परिसरात शेकरूचे दर्शन होणे ही या भागातील पर्यावरणासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे.
या घटनेनंतर वनविभागाकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले असून दापोली परिसरातील जंगल आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.












