प्रमोद ठसाळे, मनीषकुमार बारये, मंगेश पेढांबकर, अनंत मोरे यांचा समावेश
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणच्या चार सुपुत्रांची उपमुख्याधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. यामुळे शहरासह तालुक्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून यात प्रमोद उसाळे, मनीषकुमार बारये, मंगेश पेढांबकर, अनंत मोरे यांचा समावेश आहे. यातील ठसाळे यांना येथेच सेवा करण्याची संधी मिळाली असून अन्य तिघांची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बदली झाली आहे.
ठसाळे हे पाग येथील रहिवासी असून ते १९९१ साली नगर परिषदेत लिपिक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांना वरिष्ठ लिपिकापासून पुढे पदोन्नती मिळत गेली. आता ते बढतीने उपमुख्याधिकारी झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत चिपळूण, खेड, गुहागर, पोलादपूर येथे काम केले असून सध्या ते खेडमध्ये कार्यरत होते. तेथून त्यांची आता चिपळूण नगर परिषदेत बदली झाली आहे. येत्या २ वर्षात ते निवृत्त होणार आहेत. मनीषकुमार बारये हे पाग परिसरातीलच रहिवासी असून ते १९९४ साली सेवेत रुजू झाले. त्यांनाही ज्येष्ठता व परीक्षा उत्तीर्ण झाल्याप्रमाणे वेगवेगळ्या बढत्या मिळाल्या. त्यांनी रत्नागिरी, दापोली, रायगड-म्हसळा आदी ठिकाणी सेवा केली आहे. सध्या ते रत्नागिरीत कार्यरत होते. तेथून त्यांची दिग्रस यवतमाळ येथे बदली झाली आहे. मंगेश पेढांबकर हे काविळतळी येथील रहिवासी असून ते १९९५ साली लिपिक म्हणून नगर परिषदेत दाखल झाले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या बढत्या मिळाल्या. आता ते उपमुख्याधिकारी झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत रत्नागिरी, गुहागर, चिपळूण येथे काम केले आहे. सध्या ते चिपळुणात कार्यरत होते. त्यांची आता हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे बदली झाली आहे. अनंत मोरे यांचे भोम कापरे हे गाव असून ते शहरातच स्थायिक आहेत. ते १९९७ साली लिपिक म्हणून सेवेत दाखल झाले. त्यानंतर वरिष्ठ लिपिक व अन्य परीक्षा देऊन वेगवेगळ्या पदांवर पोहचले. आता ते उपमुख्याधिकारी झाले आहेत, त्यांनी आतापर्यंत चिपळूण, खेड, गुहागर, महाड येथे सेवा बजावली आहे. सध्या ते गुहागर येथे कार्यरत होते. त्यांची आता मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे बदली झाली आहे. एकाचवेळी चार सुपुत्रांना मोठ्या पदावर बढती मिळाल्याने येथील नागरिकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यांचे अनेकांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यातील ठसाळे यांनी गुरुवारी येथील त्यांचा पदभार स्वीकारला आहे.










