अनेक महिलांनी सुरू केला स्वयंपूर्ण व्यवसाय
कोशिया आणि स्पॅक उपक्रम
चिपळूण : चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोशिया) या अखिल भारतीय औद्योगिक संस्थेच्या वतीने आणि स्पॅक ऑरगोकेमिकल इंडिया लि. यांच्या सहकार्याने लोटे व परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बेकरी प्रशिक्षण कोर्सचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम चिपळूण येथील हॉटेल रिमझ येथे नुकताच उत्साहात पार पडला.
या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी बेकरी कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांना चिपळूण मधील हॉटेल रिमझ येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात तस्लिम फिरफिरे, अॅड. अश्विन बाईत, व्यावसायिक अमोल राऊत, अविनाश बहुतुले, शिक्षक हनीफ चौगुले, सामाजिक कार्यकर्ते आश्रफ बेबल आणि प्रशिक्षक समिरा फिरफिरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या उपक्रमात सुमारे ७० महिलांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २० टक्क्यांहून अधिक महिलांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करून नियमित ऑर्डर्स मिळवण्यास सुरुवात केली आहे, तर काही महिला विविध समारंभ व कार्यक्रमांमध्ये ऑर्डर्स घेऊन काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बोलताना नंदन खांबोटे म्हणाले की, कोशिया आणि स्पॅक ऑर्गोकेम इंडिया लि. सामाजिक बांधिलकी जपत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
या उपक्रमाबद्दल सहभागी महिलांनी समाधान व्यक्त करत कोशिया व स्पॅक ऑर्गोकेम इंडिया लि. यांचे मनापासून कौतुक केले. हा कार्यक्रम नंदेश खांबेटे व अमेय जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या एचआर आरती राय यांनी यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तस्लिम फिरफिरे यांनी केले.













