सहा कोटीचे रस्ता काम मर्जीतील ठेकेदाराला

 जिल्हाधिकाऱ्यांकडे मुकादम यांची तक्रार
 मुरादपूर-पेठमाप जोडरस्त्याच्या फेरनिविदेची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी)  : शहरातील मुरादपूर-पेठमाप पुलासाठी होणाऱ्या सुमारे ६ कोटी रुपयांच्या जोडरस्त्याचे मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आले काम असल्याची तक्रार माजी नगरसेवकं इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याची निविदा प्रकिया व अन्य कार्यवाही चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचे नमूद करीत फेरनिविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात मुकादम यांनी म्हटले आहे की, या कामासाठी ९ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यांची तांत्रिक पडताळणी केल्यानंतर अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठेकेदारांना मुख्याधिकाऱ्यांनी कळवले. त्यानुसार काही ठेकेदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र बहुतांशी ठेकेदारांना पूर्तता करता आली नाही. त्यामुळे फेर निविदा काढणे गरजेचे होते. तसे न करता मुख्याधिकारी व निविदा समितीने ८ निविदा पात्र ठरवल्या. मात्र त्यांचा हा निर्णय शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध आहे. त्यानंतर निविदा उघडल्यावर अर्टी-शर्थीची पूर्तता होत नसल्याचे लक्षात आल्यावर काही अटी-शर्थी रद्द करण्यात आल्या. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. अधिकार नसतानाही केवळ आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी हा खटाटोप झाला आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करुन फेरनिविदा प्रक्रिया राबवावी व याची सखोल चौकशी करुन संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही मुकादम यांनी केली आहे. ही माहिती त्यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चौकट-
निविदा प्रक्रिया नियमानुसारच
मुरादपूर-पेठमाप पुलासाठीच्या जोडरस्त्यासाठी राबवण्यात आलेली निविदा प्रकिया नियमानुसार असून त्यात कोणतेही चुकीचे फेरबदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.