रिगल कॉलेज मध्ये पावसाळी क्रीडा महोत्सव उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज चिपळूण येथे पावसाळी क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या क्रीडा स्पर्धांचे उदघाटन रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी माधवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोमचे क्रीडा शिक्षक मुकुंद पोटभरे संचालिका डॉ. सुमिता संजय शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.प्रबोध काळे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. तसेच खेळ खेळताना खेळाडू म्हणून भावना कशी जपायची हे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के यांनी आपल्या मनोगतातुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आपल्या देशात अनेक महान खेळाडू झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात आपल्या देशाचे नाव उज्वल केले आहे. आपणही आपल्या आवडीच्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून रिगलचे नाव मोठे करावे असा सल्ला दिला. या सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो मुलांच्या संघातुन बी.कॉम. या विभागाने विजेतेपद तर आय.टी.आय विभागाने उपविजेतेपद पटकावले. खो-खो मुलींच्या विभागात बी.सी.ए या विभागाने विजेतेपद तर बी.एस.सी या विभागाने उपविजेते पद पटकावले. तर व्हॉली बॉल या स्पर्धा प्रकारात बी.एस.सी या विभागाने विजेते पद मिळविले.तर आय.टी.आय या संघाने उपविजेते पद मिळवले. क्रिकेट मध्ये बी.एस.सी विजयी तर आय.टी.आय उपविजयी तर क्रिकेट मुलींमध्ये बी.एस.सी हा संघ विजयी ठरला फॅशन डिजायनिंग उपविजयी ठरला. कब्बडी या क्रीडा प्रकारात मुलांमध्ये आय.टी.आय हा संघ विजयी ठरला तर बी.कॉम. हा संघ उपविजेता ठरला. तर कॅरम या खेळात मुलींमध्ये बी.एस.सी हा संघ विजयी ठरला. या क्रीडा स्पर्धेमधून स्पर्धक खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याची अनुभूती देत सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन दाखविले. सर्व विजयी संघाना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या सर्व स्पर्धा प्राध्यापक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.