चिपळुणात राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर ठाम

 सावर्डे येथील बैठकीत निर्णय
चिपळूण (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मित्रपक्षांमधील महायुतीबाबत चर्चा सुरू असली तरी जर युती झाली नाही, तर चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ९ गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये पक्ष आपले उमेदवार उतरवणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय आ. शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत चिपळूण तालुक्यातील आगामी निवडणुकीतील गट व गणातील सध्याची राजकीय परिस्थिती, कार्यकर्त्यांची तयारी आणि मतदारसंघनिहाय संघटनात्मक बांधणी याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यात अजित पवार गटाची संघटनात्मक ताकद मोठी आहे. त्यामुळे जर भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील अपेक्षित युती आणि वाटाघाटी निष्फळ ठरल्या, तर दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली जाईल. मात्र, वरिष्ठ नेते व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करण्याचे मत यावेळी एकमुखाने मांडण्यात आले. आ. शेखर निकम म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून आपण तालुक्यात सर्व स्तरांवर विकासकामे केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून कोकणासह संपूर्ण राज्यात जलदगतीने विकास घडवून आणला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवावा. वरून महायुतीबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत आणि त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर कोणत्याही कारणास्तव युती न झाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
शौकत मुकादम यांनी सांगितले की, बैठकीत प्रांतिक उपाध्यक्ष निवडणूक लढवण्याची इच्छा असणे गैर नाही. मात्र उमेदवार निश्चितीचे अधिकार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आपला अर्ज वा संपर्क थेट आमच्याकडे साधावा, म्हणजे उमेदवार निवडीचे नियोजन योग्य पद्धतीने करता येईल. एकदा उमेदवार निश्चित झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करून शंभर टक्के विजय मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकित प्रत्येक गट-गणामध्ये बूथस्तरावर कार्यकर्त्यांची नेमणूक, जनसंपर्क मोहीम,तसेच महिला व युवक आघाडीला अधिक सक्रीय करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम, सरचिटणीस जयंद्रत खताते, तालुका अध्यक्ष अबू ठसाळे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, दादा साळवी, विजय गुजर, सुरेश खापले, शरद शिगवण, महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई निकम, दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी सभापती सूर्यकांत खेतले, मोहन शिंदे, अॅड. अमित कदम, दशरथ दाभोळकर, दिलीप माटे, सुधीर भोसले, रवी तंबिटकर, माजी सभापती रिया कांबळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने व कार्यकर्ते उपस्थित होते.