खाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण: विकतचे पाणी पिण्याची वेळ
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील पेठमाप, गोवळकोटसह चिपळूण शहराच्या काही भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. नळाला येणारे पाणी कधी खारट, तर कधी बेचव येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्यातच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पुढे उन्हाळ्यात परिस्थिती किती बिकट होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. नगर परिषद प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गोवळकोट जॅकवेलमधून अर्ध्या चिपळूण परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या परिसरातील खाडीच्या पाण्याचा प्रभाव वाढल्याने नदीत गोडे पाणी पुरेशा प्रमाणात सोडले गेले नाही, तर पिण्याच्या पाण्यात खारटपणा जाणवतो. त्यामुळे नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हा प्रश्न दरवर्षी उद्भवत असूनही त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
खेर्डीतून पाणी सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष?
या परिसरातील पाणीप्रश्नावर उपाय म्हणून खेर्डी येथून नदीत पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. मात्र, अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याने त्यांची नाराजी आहे. खाडीचे खारे पाणी पाणीपुरवठ्यात मिसळू नये, यासाठी योग्य नियोजन करणे, गोड्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे आणि पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी पाणी योजना होणे गरजेचे
यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याचे योग्य नियोजन करण्याकडे पालिकेचा कल आहे. कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी पाणी योजना सुरु करण्यात सध्या तरी आर्थिक अडचणी आहेत. ही योजना सुरु झाली तरच चिपळूण वासियांना दिलासा मिळणार आहे. अन्यथा तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.













