वनकर्मचारी गायब : स्थानिक संतप्त
बांदा l प्रतिनिधी :मडुरा गावात ओंकार हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तो काळा आंबा (रेखवाडी) परिसरात रस्त्यावर टाकलेल्या विजेच्या तारांशी खेळत होता. सुमारे दीड तास हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून राहिल्याने गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या युवकांचे हाल झाले. स्थानिकांच्या संरक्षणासाठी नियुक्त वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
ओंकार हत्ती गेले तीन आठवडे मडूरा गावात ठाण मांडून आहे. त्याच्याकडून भातशेतीसह बागायतीचेही नुकसान सत्र सुरूच आहे. हत्तीच्या वास्तव्यामुळे भात कापणीची कामेही ठप्प झाली आहेत. हत्तीला तातडीने जेरबंद करावे अशी स्थानिकांची वनविभागाकडे मागणी आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी निद्रावस्थेत आहेत असा स्थानिकांचा आरोप आहे.
मडूरा परबवाडी व रेखवाडी दरम्यानच्या काळा आंबा परिसरात आज सकाळी हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून होता. वीज जोडणी साठी टाकलेल्या विद्युत वाहिन्यांशी तो खेळत होता. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता. त्यामुळे गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. दोन्ही बाजूने वाहने अडकून पडली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.












