वन अधिकारी रजेवर : स्थानिक संतप्त
आंदोलन तात्पुरते स्थगित
बांदा : प्रतिनिधी
ओंकार हत्तीचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांनी आज शेतातच बसून अनोखे आंदोलन छेडले. आंदोलनाची लेखी पूर्वकल्पना देऊनही वन अधिकारी दिवाळीसाठी रजेवर गेल्याने शेतकरी संतप्त झालेत. हत्तीच्या दहशतीने आमचे पीक शेतातच असताना अधिकारी रजेवर जातात. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अधिकाऱ्यांना सोयरसुतक नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे मेल द्वारे सादर केल्या जातील. तसेच येत्या दोन दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्याचे आश्वासन वनपाल पृथ्वीराज प्रताप यांनी दिले. स्थानिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सज्जड इशारा देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मडूरा, कास व सातोसे गावात २७ सप्टेंबर पासून ओंकार हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. उभ्या पिकांची नासाडी, भात कापणी ठप्प झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वनविभागाकडून हत्ती पकड मोहिमे बाबत वारंवार खोटी आश्वासने दिली जात असल्याने अखेर स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मडूरा रेखवाडी सावरमळा परिसरात शेतातच बसून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.
काही वेळातच आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, बांदा वनपाल प्रमोद राणे आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी वरिष्ठ अधिकारी रजेवर असून तेच उत्तर देऊ शकतात असे सांगताच स्थानिकांचा संतापाचा पारा चढला.
शेतकरी संकटात : अधिकारी रजेवर
ओंकार हत्तीचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. भात कापणीची कामे ठप्प आहेत. हत्ती पकड मोहीम बाबत वन अधिकाऱ्यांकडून वारंवार खोटी आश्वासने दिली जात आहेत. अखेर मडूरा, कास व सातोसे सरपंच यांनी एकत्रितपणे शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला होता. असे असतानाही वन अधिकारी दिवाळी साजरी करण्यासाठी रजेवर गेले. अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सोयरसुतक नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
अत्यल्प नुकसान भरपाई
यावेळी वनपाल प्रताप यांनी शासन निकषानुसार भात नुकसानीसाठी प्रति गुंठा ५९४ रुपये भरपाई मिळेल असे सांगितले. यावर कास सरपंच प्रवीण पंडित यांनी संताप व्यक्त केला. प्रति गुंठा एक क्विंटल भात उत्पादन होऊन २६०० रुपये मिळतात. तुमच्या भरपाई रकमेत मजुरी तरी भागेल काय ? असा प्रति सवाल केला. शासनाची भरपाई रक्कम अत्यल्प असून प्रति गुंठा तिप्पट भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
पिकांचे मोठे नुकसान, शेतीत काम करणे थांबले
रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी हत्तीच्या भीतीमुळे शेतात कामाला मजूर येत नसल्याचे सांगितले. उभे पिक शेतातच गळून जात आहे. इतर गावांमध्ये भात कापणी ५० टक्क्यांहून अधिक झाली असताना मडुरा, सातोसे, कास येथील शेतकरी शेतात उतरण्याचीही हिंमत करत नाहीत. रब्बी हंगामातील मिरची पेरणीचे कामही हत्तीच्या दहशतीने थांबले असल्याचे सांगितले. भात कापणी वेळी शेतकऱ्यांना संरक्षणासाठी वनरक्षक नियुक्त केले जातील असे वनपाल प्रताप यांनी सांगितले.
हत्तीच्या अन्नाची सोय करा
हत्तीचे पोट भरत नसल्याने तो सर्वत्र फिरत आहे. वनविभागाने त्याच्या अन्नाची सोय करावी अशी मागणी विजय वालावलकर यांनी केली. जेणेकरून तो एकाच जागी थांबून पिकांचे नुकसान थांबेल असा सल्ला दिला.
सातोसे माजी सरपंच वसंत धुरी, प्रकाश वालावलकर यांनीही प्रश्न उपस्थित केले. दोन दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी कास सरपंच प्रवीण पंडित, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, सातोसे माजी सरपंच वसंत धुरी, भाजप बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, अरुण परब, मंदार वालावलकर, उल्हास परब, प्रकाश सातार्डेकर, नकुल परब, भरत शेर्लेकर, आनंद चुनाळेकर, मोहन तळवणेकर, बाबू पंडित, बाबली परब, केशव परब, पोलीस पाटील नितीन नाईक, नारायण पंडित, पांडुरंग पंडित, समीर किनळेकर, समीर पंडित, शामू पंडित, गोपाळ पंडित, शशिकांत पंडित, रुपेश राणे, प्रसाद राणे, शांताराम राणे, भाऊ भगत, प्रसाद मांजरेकर, ताता अमरे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














