दोडामार्ग: सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले भेडशीतील युवा उद्योजक दत्ताराम (बाबा) टोपले यांच्या नेतृत्वाखालील ‘बाबा टोपले मित्र मंडळा’ने आयोजित केलेल्या भव्यदिव्य नरकासुर स्पर्धेला यंदाही दोडामार्ग तालुक्यातून नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या वर्षीची स्पर्धा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ नागरिक श्री कालिदास भणगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी तथा देवस्थानचे ज्येष्ठ व्यक्ती श्री अनिल मोरजकर यांचा सत्कार श्री नंदकिशोर टोपले आणि बाबा टोपले यांच्या हस्ते करण्यात आला.
गुणी कन्येचा विशेष सत्कार
या कार्यक्रमादरम्यान ग्रामविकास कमिटी भेडशीचे अध्यक्ष तुकाराम गंगाधर टोपले यांची कन्या कु. धनश्री तुकाराम टोपले हिने नुकतीच वकिली पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. सौ. गौरी दत्ताराम टोपले, सौ. सुजाता नंदकिशोर टोपले आणि सौ. सुशांती रोहित टोपले यांच्या हस्ते धनश्रीला सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अभिजीत म्हाप्सेकर आणि नागेश टोपले यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला नगरसेवक चंदन गांवकर आणि राकेश भोळे यांनीही आपली विशेष उपस्थिती दर्शवली. तसेच, भेडशीतील व्यापारी आणि मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
युवकांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बाबा टोपले मित्र मंडळाच्या या उपक्रमामुळे दोडामार्ग तालुक्यातील सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत होत आहे












