भात कापणी, फळबाग व्यवस्थापनासाठी ‘या’ सूचनांचे पालन आवश्यकदापोली,
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिनांक २० ऑक्टोबर, २०२५ रोजी शेतकऱ्यांसाठी ५ दिवसांचा हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. विशेषतः खरीप भात पिकाची कापणी आणि फळबाग व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा सल्ला महत्त्वाचा आहे.
पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाजप्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, दिनांक २० आणि २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी केवळ हलका पाऊस पडू शकतो. कमाल तापमान .३२-३५अंश से. आणि किमान तापमान २३-२४अंश से. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात हवामान ढगाळ राहील, ज्यामुळे शेतीत रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
पीक व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या सूचना
भात (खरीप) पीक:
कापणी आणि साठवणूक: हलक्या पावसाची शक्यता असल्याने, हळव्या आणि निम गरव्या जातींचा कापणी झालेला भात तातडीने शेतातून काढून घ्यावा. कापणीची आणि मळणीची कामे पाऊस नसताना, कोरड्या हवामानातच करावीत. मळलेले धान्य ओले होऊ नये म्हणून त्वरित सुरक्षित व कोरड्या ठिकाणी वाळवावे.
कीड नियंत्रण: लोंबीवरील गंधी ढेकण्या (ढेकण्या) या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास, शिफारसीनुसार कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी.
फळबाग (आंबा, काजू, नारळ, सुपारी):
पाणी व्यवस्थापन: तापमानात वाढ होत असल्याने, नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या नवीन लागवड केलेल्या कलमांना पाण्याची व्यवस्था करावी. पूर्ण वाढ झालेल्या नारळाच्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे दररोज ३० लिटर पाणी द्यावे.
आंबा व्यवस्थापन: आंब्याच्या झाडांना नियमित मोहोर येण्यासाठी झाडाच्या बुंध्यालगतची जमीन उकरून ‘बेसिन एक्सपोजर’ ही प्रक्रिया करावी.
बागेची स्वच्छता: बागेतील वाढलेले तण व रोगग्रस्त फांद्या/झावळ्या काढून स्वच्छता करावी. यामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होऊन मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होण्यास मदत होते.
रोग नियंत्रण: आर्द्र वातावरणामुळे फांदेमर (Blight/Dieback) या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड ०.३% किंवा ०.१% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
भाजीपाला व पालेभाजी:रब्बी हंगामासाठी वांगी, मिरची, टोमॅटो पिकांची रोपवाटिका तयार करण्याची, तसेच माठ, मुळा, कोथिंबीर, पालक, मेथी या पालेभाज्यांची पेरणीची कामे पाऊस नसताना सुरू ठेवावीत. पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
पशुधन आणि मत्स्यसंवर्धन
पशुधन: तापमानात वाढ झाल्याने जनावरांना स्वच्छ, थंड आणि ताजे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. गोठ्यात अनुकूल तापमान राखण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे.
मत्स्यसंवर्धन: ढगाळ हवामानामुळे तलावातील प्राणवायूचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. यामुळे माशांची मरतुक होऊ शकते. प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी सकाळी व संध्याकाळच्या वेळेस दोन तास एरीएटर चालवावा किंवा पंपाच्या सहाय्याने तलावातील पाणी फिरवावे.
शेतकऱ्यांसाठी सूचना: कोणतीही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करताना, पावसाची उघडीप तीन ते चार तास असेल याची खात्री करावी. द्रावणात स्टिकर (चिकटणारा पदार्थ) मिसळून फवारणी केल्यास पाऊस लागून औषध वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विद्यापीठाशी संपर्क साधावा.









