*चिपळुणात माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरीचे २५ रोजी पाहिल नमन
चिपळूण (वार्ताहर) : कोकणच्या समृद्ध लोककलेतील वारसा जपणारे आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोककला म्हणजे नमन. आता या नमन कलेत महिलांनीसुद्धा स्वतःला सिध्द केले आहे. रत्नागिरी येथील माऊली महिला नमन मंडळ सध्या चर्चेत असून महाराष्ट्रातील पहिले महिलांचे नमन त्यांनी रंगभूमीवर आणले आहे. याचा चिपळूण येथे २५ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी ५ वाजता प्रयोग होणार आहे.
जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ रत्नागिरी यांनी महिलांच्या नमनाची निर्मिती केली आहे. “शिव पार्वती गजानना… रंग भरू दे आमच्या गणा..पाहिलं नमन आम्ही कोणाला बोलू..” अशी पारंपरिक आळवणी करणारे आणि मृदुंगाची थापेवर सर्वांना डोलू लावणारे नमन म्हणजेच कोकणची शान आहे. त्यामुळेच कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी हा महिला नमन उपक्रम संपूर्ण राज्यात विविध माध्यमांतून गाजत आहे. या नमन मंडळातील एक खास बाब म्हणजे सर्व कलाकार हे महिला कलाकार आहेत. नमन कलेतील गण, गौळण, आणि वगनाट्य या तिन्ही प्रकारात महिला सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे एक वेगळा आविष्कार रसिकांना पहावयास मिळणार आहे. या मंडळात वय वर्षे १५ ते ७२ या वयोगटातील महिला कलाकारांनी सादर केलेले हे नमन सांस्कृतिक कलेचा वारसा जपणारे जिवंत प्रदर्शन आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना केवळ “चूल आणि मुल “..या पुरते अडकवून न ठेवता त्यांना कलेच्या नभात उंच भरारी घेता यावी यासाठी मंडळाचा प्रयत्न आहे. पुरुषांच्या बरोबरीने सांस्कृतिक व कलात्मक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा देणे हा मानस आहे. चिपळूण येथे या नमन मंडळाचा कार्यक्रम शनिवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सादर होणार आहे. लेखक व दिग्दर्शक यशवंत वाकडे, निर्माता साईनाथ नागवेकर, आभार संस्था अध्यक्ष विनोद हळदवणेकर यांच्यासह दादा वाडेकर, शब्द गोळपकर, मदन डोर्लेकर, वसंत घडशी, सूत्रधार वासुदेव वाघे, सागर मायगडे, गीतांची रचना सर्वथा चव्हाण, मुख्य गायिका आकांक्षा वायंगणकर, सर्वथा चव्हाण, वेदा शेट्ये यांचे मार्गदर्शन लाभत आहे. नेपथ्य रचना बावा आग्रे (लांजा) यांनी केले आहे. नमन कलेचा वेगळा आणि महिलांनी प्रथमच सादर केलेल्या या कलेला मुंबई सारख्या शहरात सुध्दा नावलौकिक झाला आहे. त्यामुळे भविष्यात हे नमन अजून यशाची उंची गाठणार असेच रसिक बोलत आहेत.











