दोडामार्ग:प्रतिनिधी :तालुक्यातील उसप गावात दिवाळीच्या पवित्र सणादरम्यान विजेच्या लपंडावामुळे (खेळखंडोबा) ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे गावातील नागरिक संतप्त झाले असून, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुनील गवस यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी दोडामार्ग तालुक्यातील वीज अधिकाऱ्यांकडे केली आहे.
उसप गावात दिवाळीच्या दिवसांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी अतिदाबाने वीजपुरवठा (जास्त वीज पुरवठा) झाल्यामुळे नागरिकांची विद्युत उपकरणे (इलेक्ट्रिक उपकरणे) निकामी झाली आहेत. यामुळे ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा गंभीर आरोप सुनील गवस यांनी केला आहे.
या समस्येबाबत अधीक्षक अभियंता यांचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झाली नसल्यामुळे उसप गावातील नाराजी अधिक वाढली आहे.
पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा गवस यांचा इशारा
वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या या मोठ्या नुकसानीकडे व वीजपुरवठा समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास,जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजप तालुका उपाध्यक्ष सुनील गवस यांनी दिली आहे. त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील वीज अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.













