दोषींवर कारवाई होईपर्यंत डॉक्टर, कर्मचारी काळ्या फिती लावून करणार काम
देवगड / प्रतिनिधी :फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या आत्महत्येचा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅग्मो) संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. फलटण येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, निंदनीय व वेदनादायक घटना आहे
महिला वैद्यकीय अधिकारी हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत सर्व डॉक्टर व कर्मचारी यांना काळ्या फिती लावून कामकाज करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने दिल्या आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग (मॅग्मो) संघटनेचे अध्यक्ष डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक आणि अन्य व्यक्तींनी संबंधित महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचे आरोप आहेत.
आत्महत्येपूर्वी पीडित डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे लिहिली आहेत. यापूर्वीही पीडितेने आरोपी पोलिसांविरुद्ध वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
या घटनेचे संबंधित नराधमावर योग्य कलमानुसार गुन्हा दाखल होऊन कठोर शिक्षा होईपर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी आजपासून काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत, सिंधुदुर्गच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश पाटील व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
तसेच आवश्यकतेनुसार पुढील काळात काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने या घटनेसाठी दोन शिष्टमंडळ तयार केलेली आहेत. यापैकी एक शिष्टमंडळ पूर्णतः पीडित परिवारासोबत असेल, तर दुसरे शिष्ट मंडळ न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे.











