उत्कृष्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दर फरकाच्या रकमेसह आकर्षक भेटवस्तूंचे वितरण संस्थेच्या कार्यालयात उत्साहात करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या उत्कृष्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांसह जागा मालक आणि नवोदित कलावंताचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राजन राऊळ, उद्योजक रवींद्र राऊळ, माडखोल सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाश नाईक हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत संस्थेचे चेअरमन ॲड. सुरेश आडेलकर, व्हॉईस चेअरमन संदीप येडगे, संस्थेचे संचालक अशोक सावंत, गजानन धुरी, पांडुरंग राऊळ, ज्ञानदेव राऊळ, रामचंद्र सावंत तसेच जानू तेली, प्रताप गावडे, शरद गावडे, सुर्यकांत नाईक, संदेश धुरी, संतोष लातये, नामदेव परब, महादेव धुरी, शिवराम राऊळ, अरुण म्हालटकर, उमेश आडेलकर, अमित म्हालटकर, नाना मेस्त्री, प्रकाश राऊळ, लखन आडेलकर, हरिश्चंद्र सावंत आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्यावतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाच्या शेतकऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले शेतकरी संपत शंकर नाईक यांना रु. ५००१, द्वितीय क्रमांकाच्या विलासिनी विलास पोकळे यांना रु. ३००१, तर तृतीय क्रमांकाचे लवू धोंडू येडगे यांना रु. २००१ रुपयांचे रोख पारितोषिक देऊन, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय, संस्थेसाठी गेल्या ८ वर्षांपासून आपल्या घरातील मोक्याची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल घरमालक चंद्रकांत माडखोलकर यांचा आणि संगीत क्षेत्रात अल्पावधीत नावारूपाला आलेला नवोदित भजनी बुवा सुदेश गावडे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या जडणघडणीत चंद्रकांत माडखोलकर यांचे मोलाचे योगदान असल्याचे चेअरमन यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन ॲड. सुरेश आडेलकर म्हणाले की, संस्थेच्या पारदर्शक व्यवहारामुळे आणि मेहनती शेतकऱ्यांमुळेच संस्था निश्चित ध्येयाकडे वाटचाल करत आहे. ‘गोकुळ’ दूध संघ आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे दूध डेअरी आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. संस्थेच्या जडणघडणीत कोल्हापूर दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि संस्थेसाठी जागा उपलब्ध करून देणारे श्री. चंद्रकांत माडखोलकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
उपस्थित सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीनिमित्त दरवर्षी भेटवस्तू देण्याचा संस्थेचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून डेअरीच्या कामकाजाबाबत पूर्ण समाधान व्यक्त केले.











