मळेवाड येथे आकाश कंदील व नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

न्हावेली । प्रतिनिधी : ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरे आणि युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने मळेवाड जकातनाका येथे आयोजित गाव मर्यादित आकाश कंदील स्पर्धा आणि आमंत्रित नरकासुर स्पर्धेला नागरिकांनी मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध प्रकारांतील आकर्षक आकाश कंदील आणि एकापेक्षा एक सरस, भव्य दिव्य नरकासुर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

स्पर्धेचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तर आकाश कंदील स्पर्धेचे उद्घाटन मळेवाड-कोंडुरे सरपंच सौ. मिलन पार्सेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. मळेवाड-कोंडुरे गावातील स्पर्धकांनी आकाश कंदील स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तर आमंत्रित नरकासुर स्पर्धेसाठी तब्बल २२ भव्य दिव्य नरकासुर घेऊन विविध मंडळांनी सहभाग घेतला.

यावेळी एकापेक्षा एक असे भव्य नरकासुर पाहण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारांतील आकर्षक आकाश कंदील पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हे दोन्ही देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. आयोजकांनी नरकासुर स्पर्धेतील प्रत्येक सहभागी निमंत्रित स्पर्धकाला रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सौ. मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, अटल प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नकुल पार्सेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, महेश शिरसाट, स्नेहल मुळीक, सानिका शेवडे, अर्जुन मुळीक, कविता शेगडे, आदिशक्ती अभियान अध्यक्ष ज्योति शिरसाट, पोलिस पाटील दिगंबर मसुरकर, राजाराम मुळीक, डॉ. गणपत टोपले, लाडोबा केरकर, वैभव मोरुडकर, अमित नाईक, नंदू नाईक, माजी सरपंच सचला केरकर, आल्हाद नाईक, प्रमोद मुळीक, परशू मुळीक, भिवसेन मुळीक, सर्व सी.आर.पी., आशा, अंगणवाडी सेविका, नंदू नाईक, बाळू नाईक, बबन राऊत, गुरु नाईक, सतीश सातार्डेकर, गजानन शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.