कर्करोगाने निधन झालेल्या निशा तर्पे यांच्या वारसाला २ लाखांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा प्रदान

​बँक ऑफ इंडिया, शाखा दोडामार्गच्या प्रयत्नांना यश; नगरसेवक संतोष नानचे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

​दोडामार्ग:प्रतिनिधी

दोडामार्ग येथील रहिवासी निशा नारायण तर्पे यांचे काही दिवसांपूर्वी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील आणि वारसदार नारायण लाडू तर्पे यांना ‘बँक ऑफ इंडिया’ (शाखा दोडामार्ग) यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’अंतर्गत २ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. गुरुवारी दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या हस्ते हा धनादेश वारसांकडे सुपूर्द करण्यात आला.

​निशा तर्पे यांचे बँक ऑफ इंडिया, शाखा दोडामार्ग येथे बँक खाते होते. त्यांनी या बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना घेतली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक पवन कुलकर्णी व बँक कर्मचारी शुभम गावडे यांनी कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बँकेच्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेमुळे तर्पे कुटुंबाला २ लाख रुपयांची विमा रक्कम सुपूर्द करण्यात आली.

​बँकेच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता
​या दुःखद प्रसंगी तर्पे कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून दिल्याबद्दल ऋषिकेश गावडे यांनी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जाहीर आभार मानले.
​
धनादेश वितरण प्रसंगी माजी नगराध्यक्ष नगर पंचायत कसई दोडामार्ग तथा नगरसेवक संतोष नानचे यांच्यासह व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष सागर शिरसाट, फोंडू हडीकर, अमित गवस, शुभम गावडे, समीर राऊत, अक्षय कुमार, आकांक्षा रेड्डी, अरिहंत, नम्रता देसाई, वनश्री गवस आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.