जमीन व्यवहारातून १ लाख २० हजारांची फसवणूक

रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
रत्नागिरी : प्रतिनिधी

जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून १ लाख २० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पोमेंडी बुद्रुक येथे घडली आहे.
सुरेश काळ्या पवार (रा. पोमेंडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात फिर्यादी प्रतिभा दिनेश देशमुख (४८, रा. शंखेश्वर मधुबन अपार्टमेंट, बोर्डींग रोड, माळनाका, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फिर्यादी आणि संशयित यांच्यात जमिन खरेदी-विक्री चे व्यवहारावरुन ओळख झाली होती. संशयित सुरेश पवारने आपल्या मालकीची जमीन आहे असे फिर्यादी यांना सांगितले. त्यामध्ये १० गुंठे जमिनीचा व्यवहार ९ लाखाला ठरवून संशयिताने फिर्यादी यांच्याकडून टोकन म्हणून २० हजार घेतले. १० सप्टेंबर २०२३ ला जमिन खरेदी खताचे रजिस्ट्रेशन म्हणून ६० हजार व जमिन कंपाऊंड घालणे व डुरा बुजविणे ४० हजार असे एकूण १ लाख खर्च येणार असल्याचे संशयिताने सांगून फिर्यादी यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा खारेघाट रत्नागिरी या बॅंकेतून १ लाख रुपये २३ नोव्हेंबर २०२३ ला संशयित सुरेश पवार याच्या अकाऊंटला जमा केले. त्यानंतर जमिन विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याकरता फिर्यादी प्रतिभा देशमुख संशयिताला भेटण्यासाठी जात असता तो टाळा-टाळ करु लागला. आपली १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रतिभा देशमुख यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.