तो मृतदेह डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याची ओळख पटली
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
कणकवली : साळीस्ते येथे खूनी अवस्थेत सापडलेला मृतदेह हा श्रीनिवास रेड्डी ( वय ५३, रा. बेंगलोर -कर्नाटक ) यांचाच असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. सोमवारी दुपारी श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने बेंगलोरला रवाना करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून श्रीनिवास रेड्डी यांचे काही नातेवाईक कणकवलीत दाखल झाले होते. त्यांच्या पाहणीअंती हा मृतदेह श्रीनिवास यांचाच असल्याचे ‘कन्फर्मेशन’ पोलिसांना मिळाले होते. श्रीनिवास यांची आई देखील कणकवलीत येणार होती; मात्र प्रकृती ठीक नसल्याने येणे शक्य नसल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची (एलसीबी) दोन पथके सध्या बेंगलोरमध्ये असून, संशयित आरोपी त्यांच्या रडारवर आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या खुनाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खुनामागे आर्थिक कारणच असू शकते ?
श्रीनिवास रेड्डी हे नामांकित डॉक्टर होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते अविवाहित देखील होते. त्यांचा खून हा आर्थिक विषयातूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार तपास सुरू. मात्र तपास सुरू असताना सूत्रांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित आरोपी कैद झाले असल्याचे मिळाले आहे. त्यानुसार संशयित रडारवर असून येत्या एक ते दोन दिवसात आरोपीना ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.














