मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत महायुती म्हणून लढणार आणि सत्तेवरही येणार- खा. नारायण राणे

देवरूख (प्रतिनिधी)
अागामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत महायुती होणार असे देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढणार आिण सत्तेवरही येणार, अशी स्पष्ट भूमिका खासदार नारायण राणे यांनी बुधवारी देवरूख येथील पत्रकार परिषदेत मांडली.

देवरूख येथे खासदार नारायण राणे यांच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांना दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होईल असे पत्रकारांनी विचारले असता दुष्काळ होईल, असा टोला लगावतानाच काय होणार नसून दोघांचीही क्षमता आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उध्दव ठाकरेंबरोबर आपण ३९ वर्षे पक्षात राहिलो असून त्यांना काहीच कळत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. व्होटचोरीच्या मुद्यावरही भाष्य करताना याच्याशी भाजपचा काहीही संबंध नसून आम्ही विरोधकांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.

विरोधक उगाचच हा मुद्दा उचलून धरत आहेत. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. काँग्रेसने इतके वर्ष सत्तेत राहून जे काही केलं त्यांना आम्हाला विचारण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? असा सवाल श्री. राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

मुसळधार पावसामुळे कोकणात मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे सर्वे केले गेलेत त्याचा अहवाल येताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारमार्फत दिली जाईल. देवरूखमधील जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांचे प्रश्न त्वरित सोडवले जावेत हाच जनता दरबाराचा उद्देश असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. नागरिकांचे प्रश्न, अडचणी सोडवणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे. ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे यावेळी श्री. राणे म्हणाले.