वैभववाडी प्रतिनिधी : उंबर्डे येथील कु. सुंदरा प्रकाश शिवगण या तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल माकोडेट यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.
बुधवारी कु. सुंदरा शिवगण (वय २५, रा. भुतेश्वरवाडी) हिला प्रकृती अस्वस्थ झाल्याने नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉ. माकोडे यांनी तिला सलाईन लावले आणि नंतर रुग्णालयातून निघून गेले. त्याच वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरोटे हे घरी विश्रांती घेत होते. रुग्णालयात केवळ आरोग्यसेविका उपस्थित होती.
रुग्णाची प्रकृती अधिक खालावल्यानंतर तिला ओरोस येथे हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला, मात्र ती वेळेत उपलब्ध झाली नाही. १०२ रुग्णवाहिकेच्या चालकाला डॉक्टरांनी संपर्क साधला नाही. अखेर नातेवाईकांनी सुंदरा हिला खाजगी वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला, पण वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर भाजप उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी रुग्णालयात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आणि दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करत डॉ. नरोटे यांची बदली ओरोस येथे केली, तर डॉ. माकोडे यांची सेवा समाप्त केली आहे.











